गणपतीपुळे व्हाया आरे-वारे
गणपतीपुळे हे ठिकाण कोणाला माहित नसेल असे होणे शक्य नाही! तरी पण आज हि पोस्ट लिहिण्याचे कारण म्हणजे अलीकडेच मी रत्नागिरीला काही कामास्तव गेलो असताना अचानकच माझ्या नातेवाईकाने “चल आज तुझ्या डोळ्याचे पारणे फेडूया ” असे म्हणून गणपतीपुळ्याला जाण्याचा बेत आखला. त्याचे हे वाक्य ऐकून मी जरा गोंधळूनच गेलो होतो आणि उगाचच भीती पण वाटत होती कि आता हा माणूस आपल्याला काय काय करायला लावणार आहे देव जाणे!
नंतर काही वेळाने मी विचारलं तेव्हा तो म्हणाला कि आपण आरे-वारे रस्त्याने गणपतीपुळ्याला जाणार आहोत. तेव्हा मला कळल कि आज काहीतरी वेगळा अनुभव घेता येणार. तसा मी गणपतीपुळ्याला वेगळ्या रस्त्याने म्हणजेच निवळी फाट्याने गेलो होतो, हा निवळी फाटा मुंबईहून कोंकणात जाताना हातखाम्ब्याच्या अलीकडे मुंबई-गोवा रस्त्यावर लागतो. निवळी फाटा ते गणपतीपूळे ( इथून पुढे पुळे असा उल्लेख करतो) हे अंतर २७ ते ३१ किमी आहे, हा रस्ता तसा सरळच गावागावातून गणपतीपुळ्यात पोहचतो. असो, आता आरे-वारे हा काय प्रकार आहे ते लिहिण्याची आता वेळ आली आहे.
रत्नागिरी शहरातून पुळ्यात जाता येते, अलीकडेच आरे-वारे ह्या दोन गावांमधून जाणार नवीन रस्ता बांधण्यात आलेला आहे. मुंबई-गोवा रस्त्यावरून रत्नागिरी शहरात जाण्यासाठी हातखंबा ह्या फाट्यावरून वळण घ्यावे लागते. आत शिरल्यावर रत्नागिरी शहराची भव्यता लक्षात येते, ह्या शहरात सध्या मोठी-मोठी सरकारी कार्यालये आहेत, तसेच हे शहर जिल्ह्याचे ठिकाण असल्यामुळे मोठी बाजारपेठ, भव्य एस.टी. स्थानक देखील आहे, तसेच देशातल्या कोणत्याही भागातून कोकण रेल्वे मार्गाने इथे पोहोचता येते.
हातखंबा तिठूयाचा Satellite Photograph:
एकदा का हातखंबा तिठयावरून आत शिरलात कि सरळ सरळ रत्नागिरी शहरातून गाडी हाकत न्यायची, वर म्हटल्याप्रमाणे रत्नागिरीचे शहरीकरण तुमच्या दृष्टीस पडत राहील. मारुती मंदिर चौकातून सरळ पुढे आल्यावर एस.टी. महामंडळाचे वर्कशौप उजव्या हाताला लागेल तिथून पुढे गेल्यावर रात्नागिरी एस.टी. डेपो दिसेल., इथून पुढे गेलात कि तिसरया उजव्या वळणाला (होटेल रुद्र समोरील रस्ता ) आत वळले
इथून पुढे जाताना अजून एक छोटेखानी मारुतीचे मंदिर लागेल, मग सावरकरांचा पुतळा असलेले चौक ओलांडले कि बँक ऑफ इंडिया वरून सरळ पुढे जाऊन फाटक हाईस्कूल लागते. तीथून पुढे सरळ गेल्यावर थोड्या अंतरावर छोट्याश्या वहाळावरचा पूल ओलांडून पुढे निघालो कि लगेचच एक चार रस्ता असलेला चौक लागेल, चौकातून सरळ पुढे गेल्यावर खऱ्या अर्थाने गणपतीपुळ्याच्या आरे-वारेतून जाणारया रस्त्याचा प्रारंभ होतो. इथून मात्र मासळीच्या वासामुळे, समुद्राच्या खाऱ्या वाऱ्यामुळे आपल्याला समुद्राच्या सोबतीची जाणीव व्हायला सुरुवात येते. काही अंतरापर्यंत रस्त्याच्या एका बाजूला कोळी बांधवांची घरे दिसतात तर दुसऱ्या बाजूला समुद्राचे आट घुसलेले पाणी तसेच त्या पाण्यात मासे पकडण्यासाठी टाकलेली छोटी-मोठी जाळी दिसत राहतात. नंतर काहीश्या छोट्या उंचीच्या खाऱ्या पाण्यातील झुडुपांमधून हा रस्ता पुढे जात राहतो, अधून मधून छोट्या घरांची सोबत असतेच. मग हा रस्ता छोटी-मोठी वळण घेत थोड काळजीपूर्वक उजव्या हाताचे वळण घेतो आणि सरळ पुढे जात राहतो तो थेट आरे गावाला जोडणाऱ्या पुलापर्यंत. समुद्राच्या आत शिरलेल्या पाण्यावरील पूल पार केला कि आपण आरे ह्या गावात शिरतो, पुढे जाताना लागणारे डाव्या हाताचे वळण सोडून पुढे गेल्यावर मात्र उजव्या हाताचे वळण घ्यावे लागते.
एकदा का हा रस्ता पार करायला सुरुवात झाली कि गाडीच्या एक्सिलेटर वरील पाय आपोआपच काढून घेण्याची इच्छा होऊ लागते, कारण डाव्या हाताला दिसत असतो अथांग समुद्र आणि नजरेसमोर असतो समुद्राच्या बाजूच्या डोंगरातून जाणारा घाट रस्ता. एकदा का मध्ये लागणार पूल पार केला कि घाट रस्त्याचा चढाव सुरु होतो आणि मग खरच डोळ्याचे पारणे फिटेल असे दृश्य डोळ्यासमोर उलगडू लागते, चढाव संपवून मुख्य वळणावर येताच गाडी थांबवून जर कोणी रस्त्यावर उतरले नाही तर खरच त्याच्या सारखा अभागी तोच! कारण इथे निसर्गाने अतिशय मुक्त हस्ते नैसर्गिक सौंदर्याची उधळण केली आहे, समोर उजवीकडे डावीकडे अगदी जिथे नजर पोहचेल तिथपर्यंत अथांग असा समुद्र आपल्याला साद घालत किनाऱ्यावरच्या खडकांना आलिंगने देत असतो. इथे येण्याची उत्तम वेळ म्हणजे सूर्योदय किवा सूर्यास्त. ह्या दोन्ही वेळेस समुद्राच्या निळ्या पाण्यावर सूर्याची सोनेरी-केशरी किरणे पाहणे म्हणजे साक्षात सुर्यानारायाणाचे दर्शन घेण्यासारखेच आहे.
ह्या मुख्य वळणावर बाजूच्या गावकऱ्यांनी पर्यटकांची गरज लक्षात खाद्यपदार्थांचे छोटी-छोटी दुकाने बसवली आहेत, ह्या दुकानांमध्ये मक्याची कणसे, गरम-गरम चहा, भेळ अश्या वस्तू उपलब्ध होतात. अश्या सुंदर ठिकाणी अश्या खाद्यवस्तू मिळणे म्हणजे सोने पे सुहागा! हा रस्ता देखील राज्य शासनाने अतिशय व्यवस्थित बनवला आहे, प्रथमच शासनाने आपली सौदर्यदृष्टी दाखवून दिली आहे.
नाही म्हणाल तरी ह्या ठिकाणी अर्धा एक तास तरी जातोच, त्यातून काही हौशी पर्यटकाना रस्त्याच्या कडेची खडकाळ वाट उतरून खाली समुद्राच्या कडेच्या खडकांमध्ये जाण्याची खुमखुमी येतेच, मग काय मस्तीला उधाण येते समुद्राच्या खडकामधून उडणाऱ्या लाटांमुळे, आणि अजून तासाभराची निश्चिंती होते.
खाली उतरायला जमत नाही अशांना मात्र हा उत्साहाचा सोहळा वर बसून धन्यता मानावी लागते. मोह आवरून इथून पुढे निघालात कि समुद्राच्या सोबतीने जाणार रस्ता अचानक चढाव चढून यु
आकाराचे वळण घेऊन समुद्राची साथ सोडतो व खिंडीवजा भागातून परत एक यु टर्न घेऊन समुद्राच्या सोबतीला येतो. इथूनच पुढील रस्त्यावर क्रिष्णाली बीच रिसोर्ट, अभिषेक बीच रिसोर्ट हि दोन आलिशान हॉटेल्स दिसतात हि दोन्ही हॉटेल्स समुद्राकीनारयाला लागून आहेत.
पुढे ५-१० मिनिट हिरवळीमधून गाडी हाकल्यावर आपण एका तिठ्यावर पोहोचतो, बाजूने येणार रस्ता हा सुरुवातीला सांगितलेल्या निवळी फाट्यावरून येणारा रस्ता आहे. आलेल्या रस्त्याने सरळ अतिथी लॉजवरून पुढे आल्यावर आपल्याला गणपती पुळे मंदिराकडे जाणार रस्ता दिसतो, ह्या रस्त्याने आत गेल्यावर वाहने उभी करण्याची व्यवस्था ग्रामपंचायतीकडून करण्यात आली आहे. पुळ्यामध्ये राहण्यासाठी छोटी लॉज देखील आहेत. मंदिरात असणारी भाविकांची रांग पार करून एकदा का त्या गणेशाचे दर्शन घेतले कि प्रवासात घेतलेल्या सर्व कष्टांचा विसर पडतो. नंतर श्रमपरिहार करण्यासाठी गणपतीपुळ्याचा समुद्र आहेच कि…..हो पण समुद्रात जाताना काळजी घ्या!
संवाद…
संवाद हा मानवी जीवनात किती महत्वाचा आहे ना! संवाद साधल्याशिवाय तुमच्या मनात काय आहे हे समोरच्या व्यक्तीला समजू शकत नाही, त्यामुळे त्याच्या कडून तुम्हाला हवी ती क्रिया घडत नाही.
ये रे ये रे पावसा….
ये रे ये रे पावसा, तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा, पाऊस आला मोठा……
ह्या चार ओळी माझ्यामते प्रत्येक मराठी माणसाला चांगल्याच परीचित् असतील किवा पाठच असतील म्हणाना! पाऊस हा तसा सर्वांच्याच जिव्हाळ्याचा विषय असतो. काही जणांच्या गोड आठवणी ह्या पावसाशी निगडीत असतात….जस कि एखादा मुलगा त्याला आवडणाऱ्या मुलीकडे भर पावसात फिल्मी स्टाईलने आपल् प्रेम व्यक्त करण्याच्या इराद्यात असतो तसंच काहीसं..
तश्याच पावसाच्या कटू आठवणी देखील असतात उदा. २६ जुलै २००५ रोजी झालेला पाऊस..त्या पावसाने अनेक कुटुंबाना बेघर केले, काही काही कुटुंबातील मुले, मोठी माणसे बेपत्ता झाली. अर्थात ह्या सर्व परिस्थितीला पावसापेक्षा माणूसच जबाबदार आहे! असो ह्या विषयावर बराच खल झाला आहे आतापर्यंत……
माझ्यासाठी पाऊस, पावसाळी वातावरण म्हणजे पर्वणीच! कारण त्या वातावरणात निसर्गातील सर्वच घटक कसे ताजेतवाने दिसतात. पावसाळ्यात मुंबईच्या बाहेर निघून बघा, जागोजागी हिरवळ, धबधबे, खळाळून वाहणारे स्वछ पाणी आणि अगदी स्वर्गाचा अनुभव देतील असे डोंगरावर उतरणारे पांढरे काळे ढग! अशा वेळी मित्र-मैत्रिणींबरोबर किवा कुटुंबीय आणि नातेवाईकांसोबत काढलेली वर्षा सहल खरोखरच अभूतपूर्व आनंद देऊन जाते. अशा सहलींसाठी उत्तम ठिकाणे मुंबईच्या अगदी जवळ म्हणजेच कर्जत-कसारा ह्या भागात मुबलक प्रमाणात आहेत. पण खरा पावसाळा अनुभवण्यासाठी कोकणात जाणे उत्तम, अगदी पनवेल पासून थेट गोवा, केरळ पर्यंत.
कोकणातील निसर्ग अजूनही मानवाच्या आसुरी इछांपासून अबाधित राहिला आहे, अजूनही कोकणातील गावांमध्ये शेतीचे मळे, झाडांच्या बागा, डोंगरउतार, लांबलचक रानमळे तसेच डोळ्याचे पारणे फिटेल अशी गच्च हिरवळ बघायला मिळते. तिथल्या घरातील व्हरांड्यात/पडवीत बसून गरम चहाचे घोट घेत अनुभवलेला मुसळधार पाऊस माझ्या कायमचा लक्षात राहिला आहे. पावसाळी हंगामात केली जाणारी नांगरणी, पेरणी ही शेतीची कामे नुसती बघण्यासारखीच नाहीत तर अनुभवण्यासारखी आहेत. तिथे आपल्याला प्रत्यक्षात आकाश, पाणी आणि जमीन ह्या तीन महाभूतांचा मिलाप बघायला मिळतो.
शहरातील पाऊस हा एक मजेदार विषय आहे! कारण पाऊस सुरु झाला कि लोकांच्या कामात रेल्वे, बसेस, ट्राफिक जाम ह्या कारणांमुळे अडथळे, समस्या निर्माण होतात.मग काय पावसाला अक्षरशः शिव्यांची लाखोली वाहिली जाते. पण खरी पंचाईत होते ती ऑफिसमध्ये रेल्वेने जाणाऱ्या आम आदमीची….२-३ तास सलग पाऊस झाला कि मुंबईची लाइफलाईन असणाऱ्या दोन्ही रेल्वे माना टाकतात. आणि मग प्रत्येक न्यूज च्यानेल तसेच वर्तमानपत्रातून चाकरमान्यांची तारांबळ, जनजीवन विस्कळीत अशा स्वरूपाच्या ब्रेकिंग न्युज झळकू लागतात, अर्थात अस काही घडल्याशिवाय शहरवासियांना पावसाळा अनुभवल्यासारखे वाटतच नाही!
दरवर्षी पावसाळ्यात होणारे वाहतुकीचे प्रोब्लेम्स, पुराच्या पाण्याने होणे घरादारांचे नुकसान, खड्डेमय रस्ते ह्या सर्व गोष्टी आपल्या अंगवळणीच पडल्या आहेत, त्यामुळे सामान्य माणूस आहे त्या परिस्थितीला तोंड देत आपापले दैनंफिन व्यवहार पार पाडत असतो.
असो हे लिहिण्यामागे उद्देश हाच कि पावसाळा ह्या विषयावर प्रत्येक व्यक्तिगणिक मते असू शकतात त्यापैकिच माझे मत मांडण्याचा हा प्रयत्न. तेव्हा ह्या वर्षीच्या पावसाळ्यात सर्वानी मनसोक्त भिजूया आणि भिजवूया……मग तुमचा काही प्लान ठरलाय कि नाही?
लेख जरा जास्तच मोठा झाला आहे अस वाटतंय त्यामुळे तुमच्या संयमाची अजून परीक्षा न पाहता इथेच संपवतो. तुमची पावसाबद्दल काही मत असली तर जरुर लिहा कमेंट्स मध्ये, वाचायला आवडेल मला!
विजयदुर्ग किल्ला
गाव: विजयदुर्ग
ग्रामपंचायत: विजयदुर्ग
जवळचे पर्यटन स्थळ: गिर्ये गाव, पवन चक्की
अंतर : ८ किमी
जवळचे बस स्थानक: विजयदुर्ग
जवळचे रेल्वे स्टेशन: कणकवली
जवळचे विमानतळ: गोवा
हा किल्ला शिलाहार घराण्यातील राजा भोज याने सन ११९५ ते १२०० या कालावधीत बांधला. त्यावेळी हा किल्ला “घेरीया” नावाने ओळखला जात होता. कालांतराने हा किल्ला यादवांनी ताब्यात घेतला नंतर तो विजयनगरच्या राजाच्या ताब्यात गेला. १४३१ साली बहमनि सुलतान अल्लाउद्दीन अहमदशाह याने तो ताब्यात घेतला. सन १४९० ते १५२६ या काळात बहमनी राज्याचे पाच तुकडे झाल्याने हा किल्ला विजापुरकरांकडे आला, तो १२५ वर्षे त्यांच्या अमलाखाली होता. सन १६५३ साली शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून त्यात अनेक सुधारणा केल्या.
हा किल्ला मुंबईच्या दक्षिणेला तसेच गोव्याच्या उत्तरेला असून किल्याच्या बाजूने ४० किमी लांबीची विजयदुर्ग नावाची खाडी आहे. हे एक उत्कृष्ठ बंदर आहे. किल्ल्याचे क्षेत्रफळ १७ एकर १९ गुंठे असून तटाची उंची ३६ मीटर एवढी आहे.
शिवाजी महराजांनी ३ उंच तटबंद्या, टेहळणी बुरुज तसेच सुटसुटीत अश्या अंतर्गत इमारती बांधून किल्ल्याचे मजबुतीकरण केले. किल्याच्या प्रवेशद्वारात मारुती मंदिर, अंतर्भागात महादेव मंदिर असून भवानी मातेच्या मंदिराचे अवशेषही दृष्टीस पडतात.
किल्याला एकूण २० बुरुज असून मध्यभागी घोड्यांच्या पागा आहेत.
किल्ल्याचे रेखाचीत्र
पाण्याच्या प्रचंड टाक्या, पिराची सदर, नगारखाना, खलबत खाना, साहेबाचे ओटे तसेच दोन भुयारी मार्ग अशी पाह्ण्यासारखी ठिकाणे आहेत. पाण्यामध्ये बांधलेली भिंत ही ह्या किल्याची खासियत असून ही भिंत शत्रूच्या मोठ्या जहाजांपासून किल्याची राखण करत होती.
इंग्रज, पोतुगीज, डच ह्यांच्यासारख्या परकीयांनी जिब्राल्टर असा ह्या किल्ल्याचा उल्लेख केला होता. मराठ्यांच्या काळात कान्होजी आंग्रे, संभाजी आंग्रे व नंतर आनंदराव धुळप यांच्यासारखे तेजस्वी आरमार प्रमुख होऊन गेले.
सध्या ह्या किल्ल्याच्या पायथ्याशी छोटस बंदर तसेच S.T. महामंडळाचा डेपो आहे. किल्ल्यापासून जवळच ६-७ किमी च्या अंतरात श्रीदेव रामेश्वराचे जमीन पोखरून तयार झालेल्या जागेत बांधलेले भव्य मंदिर आहे. देवी चौडेश्वरी मंदिर देखील ह्याच परिसरात आहे, ह्या मंदिराचे हल्लीच नुतनीकरण करण्यात आले आहे. जवळच गिर्ये गावात स्थित असलेल्या पवनचक्क्या देखील पाहण्यासारखे ठिकाण आहे.
रत्नसिंधू प्रकल्पांतर्गत बांधलेल्या पुलामुळे रत्नागिरी जिल्हा आणि सिंधुदुर्ग जिल्हा आता अर्ध्या तासाच्या अंतरावर आले आहेत. ह्या किल्यावर राजापूर तालुक्यातील मिठगवाणे गावाजवळील पंगेरे गावातील जेटीवरून होडीनेदेखील जाता येते, तेवढीच समुद्र सफर.
काय मग जाताय का विजयदुर्ग भ्रमंतीला?
ताज्या प्रतिक्रिया / Recent Comments