गणपतीपुळे व्हाया आरे-वारे
गणपतीपुळे हे ठिकाण कोणाला माहित नसेल असे होणे शक्य नाही! तरी पण आज हि पोस्ट लिहिण्याचे कारण म्हणजे अलीकडेच मी रत्नागिरीला काही कामास्तव गेलो असताना अचानकच माझ्या नातेवाईकाने “चल आज तुझ्या डोळ्याचे पारणे फेडूया ” असे म्हणून गणपतीपुळ्याला जाण्याचा बेत आखला. त्याचे हे वाक्य ऐकून मी जरा गोंधळूनच गेलो होतो आणि उगाचच भीती पण वाटत होती कि आता हा माणूस आपल्याला काय काय करायला लावणार आहे देव जाणे!
नंतर काही वेळाने मी विचारलं तेव्हा तो म्हणाला कि आपण आरे-वारे रस्त्याने गणपतीपुळ्याला जाणार आहोत. तेव्हा मला कळल कि आज काहीतरी वेगळा अनुभव घेता येणार. तसा मी गणपतीपुळ्याला वेगळ्या रस्त्याने म्हणजेच निवळी फाट्याने गेलो होतो, हा निवळी फाटा मुंबईहून कोंकणात जाताना हातखाम्ब्याच्या अलीकडे मुंबई-गोवा रस्त्यावर लागतो. निवळी फाटा ते गणपतीपूळे ( इथून पुढे पुळे असा उल्लेख करतो) हे अंतर २७ ते ३१ किमी आहे, हा रस्ता तसा सरळच गावागावातून गणपतीपुळ्यात पोहचतो. असो, आता आरे-वारे हा काय प्रकार आहे ते लिहिण्याची आता वेळ आली आहे.
रत्नागिरी शहरातून पुळ्यात जाता येते, अलीकडेच आरे-वारे ह्या दोन गावांमधून जाणार नवीन रस्ता बांधण्यात आलेला आहे. मुंबई-गोवा रस्त्यावरून रत्नागिरी शहरात जाण्यासाठी हातखंबा ह्या फाट्यावरून वळण घ्यावे लागते. आत शिरल्यावर रत्नागिरी शहराची भव्यता लक्षात येते, ह्या शहरात सध्या मोठी-मोठी सरकारी कार्यालये आहेत, तसेच हे शहर जिल्ह्याचे ठिकाण असल्यामुळे मोठी बाजारपेठ, भव्य एस.टी. स्थानक देखील आहे, तसेच देशातल्या कोणत्याही भागातून कोकण रेल्वे मार्गाने इथे पोहोचता येते.
हातखंबा तिठूयाचा Satellite Photograph:
एकदा का हातखंबा तिठयावरून आत शिरलात कि सरळ सरळ रत्नागिरी शहरातून गाडी हाकत न्यायची, वर म्हटल्याप्रमाणे रत्नागिरीचे शहरीकरण तुमच्या दृष्टीस पडत राहील. मारुती मंदिर चौकातून सरळ पुढे आल्यावर एस.टी. महामंडळाचे वर्कशौप उजव्या हाताला लागेल तिथून पुढे गेल्यावर रात्नागिरी एस.टी. डेपो दिसेल., इथून पुढे गेलात कि तिसरया उजव्या वळणाला (होटेल रुद्र समोरील रस्ता ) आत वळले
इथून पुढे जाताना अजून एक छोटेखानी मारुतीचे मंदिर लागेल, मग सावरकरांचा पुतळा असलेले चौक ओलांडले कि बँक ऑफ इंडिया वरून सरळ पुढे जाऊन फाटक हाईस्कूल लागते. तीथून पुढे सरळ गेल्यावर थोड्या अंतरावर छोट्याश्या वहाळावरचा पूल ओलांडून पुढे निघालो कि लगेचच एक चार रस्ता असलेला चौक लागेल, चौकातून सरळ पुढे गेल्यावर खऱ्या अर्थाने गणपतीपुळ्याच्या आरे-वारेतून जाणारया रस्त्याचा प्रारंभ होतो. इथून मात्र मासळीच्या वासामुळे, समुद्राच्या खाऱ्या वाऱ्यामुळे आपल्याला समुद्राच्या सोबतीची जाणीव व्हायला सुरुवात येते. काही अंतरापर्यंत रस्त्याच्या एका बाजूला कोळी बांधवांची घरे दिसतात तर दुसऱ्या बाजूला समुद्राचे आट घुसलेले पाणी तसेच त्या पाण्यात मासे पकडण्यासाठी टाकलेली छोटी-मोठी जाळी दिसत राहतात. नंतर काहीश्या छोट्या उंचीच्या खाऱ्या पाण्यातील झुडुपांमधून हा रस्ता पुढे जात राहतो, अधून मधून छोट्या घरांची सोबत असतेच. मग हा रस्ता छोटी-मोठी वळण घेत थोड काळजीपूर्वक उजव्या हाताचे वळण घेतो आणि सरळ पुढे जात राहतो तो थेट आरे गावाला जोडणाऱ्या पुलापर्यंत. समुद्राच्या आत शिरलेल्या पाण्यावरील पूल पार केला कि आपण आरे ह्या गावात शिरतो, पुढे जाताना लागणारे डाव्या हाताचे वळण सोडून पुढे गेल्यावर मात्र उजव्या हाताचे वळण घ्यावे लागते.
एकदा का हा रस्ता पार करायला सुरुवात झाली कि गाडीच्या एक्सिलेटर वरील पाय आपोआपच काढून घेण्याची इच्छा होऊ लागते, कारण डाव्या हाताला दिसत असतो अथांग समुद्र आणि नजरेसमोर असतो समुद्राच्या बाजूच्या डोंगरातून जाणारा घाट रस्ता. एकदा का मध्ये लागणार पूल पार केला कि घाट रस्त्याचा चढाव सुरु होतो आणि मग खरच डोळ्याचे पारणे फिटेल असे दृश्य डोळ्यासमोर उलगडू लागते, चढाव संपवून मुख्य वळणावर येताच गाडी थांबवून जर कोणी रस्त्यावर उतरले नाही तर खरच त्याच्या सारखा अभागी तोच! कारण इथे निसर्गाने अतिशय मुक्त हस्ते नैसर्गिक सौंदर्याची उधळण केली आहे, समोर उजवीकडे डावीकडे अगदी जिथे नजर पोहचेल तिथपर्यंत अथांग असा समुद्र आपल्याला साद घालत किनाऱ्यावरच्या खडकांना आलिंगने देत असतो. इथे येण्याची उत्तम वेळ म्हणजे सूर्योदय किवा सूर्यास्त. ह्या दोन्ही वेळेस समुद्राच्या निळ्या पाण्यावर सूर्याची सोनेरी-केशरी किरणे पाहणे म्हणजे साक्षात सुर्यानारायाणाचे दर्शन घेण्यासारखेच आहे.
ह्या मुख्य वळणावर बाजूच्या गावकऱ्यांनी पर्यटकांची गरज लक्षात खाद्यपदार्थांचे छोटी-छोटी दुकाने बसवली आहेत, ह्या दुकानांमध्ये मक्याची कणसे, गरम-गरम चहा, भेळ अश्या वस्तू उपलब्ध होतात. अश्या सुंदर ठिकाणी अश्या खाद्यवस्तू मिळणे म्हणजे सोने पे सुहागा! हा रस्ता देखील राज्य शासनाने अतिशय व्यवस्थित बनवला आहे, प्रथमच शासनाने आपली सौदर्यदृष्टी दाखवून दिली आहे.
नाही म्हणाल तरी ह्या ठिकाणी अर्धा एक तास तरी जातोच, त्यातून काही हौशी पर्यटकाना रस्त्याच्या कडेची खडकाळ वाट उतरून खाली समुद्राच्या कडेच्या खडकांमध्ये जाण्याची खुमखुमी येतेच, मग काय मस्तीला उधाण येते समुद्राच्या खडकामधून उडणाऱ्या लाटांमुळे, आणि अजून तासाभराची निश्चिंती होते.
खाली उतरायला जमत नाही अशांना मात्र हा उत्साहाचा सोहळा वर बसून धन्यता मानावी लागते. मोह आवरून इथून पुढे निघालात कि समुद्राच्या सोबतीने जाणार रस्ता अचानक चढाव चढून यु
आकाराचे वळण घेऊन समुद्राची साथ सोडतो व खिंडीवजा भागातून परत एक यु टर्न घेऊन समुद्राच्या सोबतीला येतो. इथूनच पुढील रस्त्यावर क्रिष्णाली बीच रिसोर्ट, अभिषेक बीच रिसोर्ट हि दोन आलिशान हॉटेल्स दिसतात हि दोन्ही हॉटेल्स समुद्राकीनारयाला लागून आहेत.
पुढे ५-१० मिनिट हिरवळीमधून गाडी हाकल्यावर आपण एका तिठ्यावर पोहोचतो, बाजूने येणार रस्ता हा सुरुवातीला सांगितलेल्या निवळी फाट्यावरून येणारा रस्ता आहे. आलेल्या रस्त्याने सरळ अतिथी लॉजवरून पुढे आल्यावर आपल्याला गणपती पुळे मंदिराकडे जाणार रस्ता दिसतो, ह्या रस्त्याने आत गेल्यावर वाहने उभी करण्याची व्यवस्था ग्रामपंचायतीकडून करण्यात आली आहे. पुळ्यामध्ये राहण्यासाठी छोटी लॉज देखील आहेत. मंदिरात असणारी भाविकांची रांग पार करून एकदा का त्या गणेशाचे दर्शन घेतले कि प्रवासात घेतलेल्या सर्व कष्टांचा विसर पडतो. नंतर श्रमपरिहार करण्यासाठी गणपतीपुळ्याचा समुद्र आहेच कि…..हो पण समुद्रात जाताना काळजी घ्या!
रस्त्याने जातांना दोन्ही बाजूला असलेली आंब्याची झाडं.. उन्हाळ्यात आंब्यांनी लगडलेली पाहिली की एखादी कैरी तोडायचा मोह आवरत नाही. मस्त जागा आहे.
काका तुम्ही म्हणताय ते अगदी खरय….पण आंबे तोडण्याचा मोह पुरा करताना आजूबाजूला कोणी नाही ना ह्याच्याकडे देखील लक्ष ठेवाव लागत….नाहीतर कोंकणी बागायातदाराचा हिसका खावा लागतो. कोकणी माणस पण पक्की हिशोबी झाली आहेत ह्या बाबतीत.
रत्नागिरीला बरेच वेळा जातो …. गेल्याच महिन्यात मी अरे-वारे ला जाऊन आलो. आपण केलेले वर्णन खूप छान आहे. पुनःप्रत्ययाचा आनंद झाला. गेल्या काही वर्षातच प्रसिद्धीला आलेला अप्रतिम स्पॉट आहे. लाभलेला अथांग समुद्र आणि समुद्रापर्यंत पोचलेल्या डोंगर रांगा हेच तर कोकणाच्या सौंदर्याचे प्रतिक आहे.
धन्यवाद….ब्लोगला भेट देऊन पोस्ट वाचल्याबद्दल. तुम्ही म्हणताय ते खरच आहे, कोकणच्या सौदर्याचे तुम्ही केलेले एका वाक्यातील वर्णन…….अप्रतिम!
इन्टरनेटवर जेव्हा मराठीतून वाचायला मिळतं, तेव्हा होणारा अवर्णनीय आनंद उप भोगणार्यांच्या यादीत मी ही नव्यानेच सामील झालोय ! तुमचे लिखाण तर अतिप्रचंड भारी आहे बुवा !
धन्यवाद अभिजीतजी! इंटरनेटवर मराठी वाचण्याचा अनुभव खरच ग्रेट आहे.
मी पण अलीकडेच सुरुवात केली आहें.
छान आहे तुमचा ब्लॉग….
सध्या नुसताच वाचत आहे….प्रतिक्रिया नंतर देईन…
धन्यवाद……..ब्लॉगला विझीट केल्याबाद्द्दल ……
काहीही असो पण प्रतिक्रिया महत्वाची!